RBI imposes restrictions on bank रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं मुंबईतील न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या कामकाजावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयनं निर्बंध घातल्यानं बँकेत ठेवी ठेवणाऱ्या खातेदारांना त्यांची रक्कम काढता येणार नाही. न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक आता कर्ज देऊ शकणार नाही किंवा ठेवी देखील स्वीकारु शकणार नाही. आरबीआयनं गुरुवारी 13 फेब्रुवारीला बँकेचं कामकाज बंद झाल्यानंतर पुढील सहा महिन्यांसाठी निर्बंध लागू केले आहेत.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेतील मोठ्या प्रमाणात अनियमतता झाल्यानं बँकेच्या कामकाजावर अनेक प्रकारच्या बँकिग व्यवसायाशी संबंधित निर्बंध घातले आहेत. आरबीआयच्या कठोर भूमिकेनंतर या बँकेला ग्राहकांना कर्ज देता येणार नाही याशिवाय ग्राहकांकडून ठेवी घेण्यास देखील बंदी घालण्यात आली आहे. आरबीआयच्या या निर्णयानंतर ठेवीदारांच्या अडचणी वाढल्या आहेत. बँकेचे खातेधारक आता त्यांच्या खात्यातून पैसे काढू शकणार नाहीत. आरबीआयनं सध्या बँकेवर केवळ सहा महिन्यांसाठी निर्बंध घातले आहेत. त्यामुळं या काळात बँकेची स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल. सहा महिन्यानंतर आरबीआय त्यांच्या निर्णयाचं पुनरावलोकन करेल.
आरबीआयनं म्हटलं, बँकेकडील सध्याची रोकड स्थिती पाहता हा निर्देश देण्यात येतो की ठेवीदारांच्या बचत खाते किंवा चालू खात्यातील, इतर खात्यातून कोणत्याही प्रकारची रक्कम काढण्याची परवानगी देऊ नये. मात्र, बँक कर्मचाऱ्यांचं वेतन, भाडे आणि वीज बील यासाठी आवश्यक गोष्टींवर खर्च करण्यास बँकेला परवानगी देण्यात आली आहे.